सासवड रस्त्यावरील सायकलट्रॅकवर उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई कधी

पुणे : हडपसर-सासवड रस्त्याचे रुंदीकरण करून पदपथ आणि सायकलट्रॅक पादचारी आणि सायकलचालकांसाठी उभारला की, ट्रॅव्हल्सची वाहने उभी करण्यासाठी उभारला. पदपथावर उभ्या केलेल्या वाहनांवार वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असली तरी, सासवड रस्त्यावरील पदपथ आणि सायकलट्रॅकवरील खासगी वाहनांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हडपसर-सासवड आणि पुणे सोलापूर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणासह वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे. धनदांडग्यांच्या हॉटेलवर कारवाई करायची नाही असा नियम आहे का, दुचाकीचालक मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेला, तर त्याच्या वाहनावर तातडीने कारवाई केली जाते. मात्र, हीच तत्परता मोठ्या वाहनांवर कारवाई करण्यात का दाखविली जात नाही. कारवाई नेमकी कोणाच्या इशाऱ्याने होत आहे, याचे गुपित काही सामान्यांना उलगडले नाही.

हडपसर वाहतूक विभागाकडून फक्त दुचाकीवर कारवाई करण्यासाठी आहे का, ग्लायलिंग सेंटरच्या ससाणेनगरकडील बाजूकडील रस्त्यावर वाहनांची वर्दळ नाही, तेथील दुचाकीवर करून सामान्य दुचाकीचालकाला वेठीस धरले जात आहे. मोठमोठ्या हॉटेलसमोर बॅरिगेट लावून रस्ता अडवून चारचाकी उभी केल्या जातात, वाहतूक विभागाची कारवाई फक्त नावाला आहे का, गरजेसाठी आहे. हॉटेलसमोर वाहने उभी केल्यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण होत आहे. सोलापूर रस्त्यावर उड्डाण पुल संपताच असलेल्या हॉटेलसमोर बॅरिगेट लावून रस्ता अडवला आहे, पदपथावर त्यांच्याच ग्राहकाची वाहने उभी असतात, तेथे वॉचमन इतरांना वाहने लावू देत नाही, ही जागा त्यांच्या मालकीची आहे का, तेथे उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक विभाग कारवाई करण्यासाठी का धजावत नाही, असे एक ना अनेक प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहत नाहीत. वाहतूक विभाग फक्त त्यांच्या सोयीने वाहनांवर कारवाई करण्यासाठी आहे की काय, अशी विचारणा आता दुचाकीचालकांकडून होऊ लागली आहे.

सातववाडी-भेकराईनगर दरम्यानचा पदपथ दुकानदारांनी स्वतःचा माल ठेवून अडवून ठेवला आहे. रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच ठिकठिकाणी गतिरोधक असल्यामुळे वाहनचालकांची पुरती तारांबळ उडत आहे. पदपथ, सायकलट्रॅक आणि रस्त्यावरील अतिक्रमणावर वाहतूक आणि पालिका अतिक्रमण विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

अ‍ॅड. व्ही. व्ही. बोरकर म्हणाले की, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सर्रास वाहनांवर कारवाई करण्यासाठी पालिका आणि वाहतूक विभागाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. रस्ते रुंदीकरण होत नाहीत, उलट त्यावर अतिक्रमण झाल्याने अरुंद झाले आहेत. त्यामुळे सतत वाहतूककोंडीचा सामना नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत कऱण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, वाहतूक विभागाकडून तशा उपाययोजना होताना दिसत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.