जनआक्रोश : हडपसरला जम्बो कोविड हॉस्पिटल कधी मिळणार?

पुणे : महापौर साहेब… जम्बो कोविड हॉस्पिटल करण्यासाठी पुण्यातील पेठा दिसतात. मात्र, ज्या पुण्यातील कचरा हडपसरमध्ये टाकला जातो, त्या हडपसरमध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी कधी मुहूर्त मिळणार, हडपसर पुणे महानगरपालिकेमध्ये आहे, पुणे शहराचा कचरा हडपसरमध्ये आणून टाकला जातो. मात्र, कोरोना महामारीमध्ये उपचारासाठी एकही कोविड हॉस्पिटल नाही. हडपसरमध्ये जम्बो कोविड रुग्णालय नसल्यामुळे अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय रुग्णालय नाही, त्यामुळे नागरिकांना उपचार मिळत नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे जम्बो कोविड उभारण्यासाठी जनता आक्रोश करीत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी एक पाऊल पुढे टाकून आरोग्य सेवा देण्यासाठी जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी हडपसरवासिय नागरीक करीत आहेत.

हडपसरमधील ससाणेनगर नागरीकृती समितीचे अध्यक्ष मुकेश वाडकर यांनी मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, महापौर यांना थेट ई-मेलद्वारे जम्बो कोविड हॉस्पिटलची मागणी केली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य पोर्टलवर तशी तक्रारही केली आहे. पुणे शहराच्या कचऱ्याचा प्रश्न उभा राहतो, त्यावेळी महापालिका प्रशासनाला हडपसर दिसते. मात्र, आज कोरोना महामारीने जनता सैरभर झाली, तर हडपसर का दिसत नाही, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आजच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करून नागरिकांना उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आर्जवी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना महामारीमध्ये हडपसरवासियांचे बळी गेल्यानंतर राजकारणी मंडळी अंत्यविधीप्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होत भली मोठी भाषणे ठोकतात. एवढ्यावरच थांबत नाहीत, तर श्रेयनामावली वाचण्यासही कमी करीत नाहीत. आता भाषण करण्याची वेळ नाही, आधार दिला पाहिजे, ही वस्तुस्थिती कोणी नाकारत नाही. आता जम्बो कोविड हॉस्पिटल उभा करून नागरिकांना सुरक्षित कसे ठेवू शकतो, हा विचार कृतीत आणण्याची वेळ आहे. कोरोनाबाधितांना आता उपचार मिळण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न करावेत, एवढीच सामान्य जनतेची मागणी आहे.

अंत्यसंस्कारासाठी एकवेळ उपस्थित राहू नका, पण लोकांना समस्या काय आहेत, त्या सोडविण्यासाठी यायला पाहिजे. मतदानासाठी घरोघरी पोहोचता तर कोरोनाने सैरभैर झालेल्या जनतेपर्यंत तुम्ही का पोहोचत नाही, अशी विचारणा आता जनता करीत आहे. मागिल सहा महिन्यापूर्वी कोरोनाचा ज्वर कमी झाला होता. त्यावेळी कोविड हॉस्पिटलची मागणी कशी केली, मग ती आतापर्यंत का पूर्ण झाली नाही. आता पुण्यात जम्बो कोविड हॉस्पिटल उभे राहू शकते, तर हडपसरला का राहू शकले नाही. मनसेचा एक नगरसेवक 30 बेडचे हॉस्पिटल उभे करू शकतो, तर हडपसरचे नगरसेवक जम्बो कोविड हॉस्पिटल का सुरू करीत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.