महाराष्ट्र संपूर्ण अनलॉक कधी होणार ? उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

मुंबई : वृत्त संस्था – लॉकडाऊनमध्ये बंद असलेले अनेक उद्योग एक-एक करून सुरू करत आहोत. हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू होतील. पण कोरोनाबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना हे आवाहन केले. यावेळी कोरोनाची स्थिती आणि मंदिर उघडण्याबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोरोनाचा स्पष्ट अंदाज आल्याशिवाय कोणताही निर्णय घाईघाईत घेतला जाणार नाही, असे म्हणत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कधी अनलॉक होणार हे सांगणे तूर्तास टाळले आहे.

विरोधकांचं काय जातंय विचारायला
अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग आणि बाजारपेठा सुरू केल्या आहे. मात्र, मंदिर, लोकल रेल्वे सेवा, जीम बंद आहेत. मंदिर उघडावीत यासाठी विरोधकांकडून होत असलेल्या टिकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, दारूची दुकानं उघडली, पण मंदिरं का उघडली जात नाही, अशी विचारणा विरोधक करत आहेत. विरोधकांना विचारायला काय जाते. पण, ही जबाबदारी आमच्यावर आहे. कोरोना अजून गेलेला नाही.

पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये
अनलॉकबाबत सरकार सावध भूमिका घेत असल्याचे स्पष्ट करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जगात काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यासाठी आपण सावधपणे पुढे जायला हवे. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागत आहेत. शासनाची जनतेप्रती जबाबदारी आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय अजून घेतलेला नाही. सुरू केलेली कोणतीही गोष्ट पुन्हा बंद करण्याची पाळी येऊ नये, आणि पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका, शिस्त पाळा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण भागात कोरोना वाढतोय
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ लागले आहे. परंतु, कोरोना हा पसरत चाललेला आहे. कोरोनाचे रुग्ण आता ग्रामीण भागात वाढत चालले आहे. काही जणांना कोरोना होऊन गेला असेल. तर काही जणांना सौम्य लक्षणे आहेत. मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही स्थिती संघर्षाची आहे. त्यांची काळजी घेण्याची गरज आहे.

सणांमध्ये सावध राहा
आगामी संणांबाबत राज्यातील जनतेला ठाकरे यांनी आवाहन करताना म्हटले की, अजूनही कोरोना आपल्यातून गेलेला नाही. त्यामुळे सर्व धर्मियांनी सण समारंभ साधेपणाने साजरे केले. आता नवरात्र, दिवाळीचा सण येत आहे. हळूहळू आपण दारं उघडत आहोत. उघडलेल्या दारातून सुबत्ता येऊ द्या, नाहीतर कोरोना आला तर कोणीही वाचवू शकणार नाही.

लोकल सुरू करण्यास नकार
मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे ही त्रिसुत्री सर्वांनी तंतोतंत पाळली पाहिजे. सार्वजनिक काळजी घ्या. मास्क हाच आपला ब्लॅकबेल्ट आहे. सर्वांनी तो वापरणे बंधनकारक आहे, असे म्हणत ठाकरे यांनी सध्याच्या स्थितीत लोकल सुरू करण्यास नकार दिला.