PM नरेंद्र मोदी कधी घेणार लस ?, राजनाथसिंह यांनी सांगितली ती वेळ

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हॅक्सिन देण्यास शनिवारी सुरुवात झाली आहे. अनेक देशातील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांनी कोरोनाविरोधी लस घेऊन नागरिकांना या लशीच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनीही कोरोना व्हॅक्सिन घ्यावी, अशी मागणी सोशल मिडियावरुन होत आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री हे कधी लस घेणार याविषयी सरंक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ही वेळ सांगितली आहे. राजनाथसिंह यांनी एका हिंदी टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना याचे उत्तर दिले. राजनाथसिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) हे कोरोनावरील लसीसाठी शास्त्रज्ञांना वेळोवेळी प्रोत्साहित करत आहेत.

सध्या कोविड १९ विरोधातील लढ्यामधील फ्रंटलाईन वर्कसचे लसीकरण केले जात आहे. हे पूर्ण झाले की ५० वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. त्यावेळी आम्ही राजकीय क्षेत्रात वावरणारे लोक कोरोनावरील लस घेऊ.

जनतेच्या मनात विश्वास वाढविण्यासाठी इतर देशाातील नेत्यांप्रमाणे आपल्या देशातील नेत्यांनी लस घेतली पाहिजे, असा विचार आपल्या देशातील जनता करेल, असे मला वाटत नाही. कारण कोरोनावरील लसीची अंतिम चाचणी झाली आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ही चाचणी घेतली आहे. देशातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे.

दरम्यान, शनिवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरात १ लाख १८१ जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे़ देशात पहिल्या दिवशी ३ हजार ६ लसीकरण केंद्रातून ३ लाख लोकांना लस देण्यात येणार होती़ मात्र, वैद्यकीय क्षेत्रातीलच अनेकांनी लस घेण्यास नकार दिला आहे़.

लस घेण्यास नकार देताना काही डॉक्टरांनी सांगितले की, ज्यावेळी कोरोनाचा प्रभाव इतका मोठा होता, त्यावेळीही आम्ही सर्व सुरक्षा घेऊन रुग्णांवर उपचार करत होतो़ आता समाजामध्ये इम्युनिटी वाढल्याने कोरोनाचा धोका कमी झाला आहे़ असे असताना लस घेऊन फायदा होणार नाही, असे वाटल्याने आम्ही लस घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.