Keshav Upadhye : ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Work from मंत्रालय कधी करणार?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तौत्के चक्रीवादळाचा मुंबईसह शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 17) सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन वादळी परिस्थितीचा, बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? अशी विचारणा उपाध्ये यांनी केली आहे. राज्यात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळवला. मुख्यमंत्री तर वर्क फ्रॉम होम मिनिस्टर झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान वर्क फ्रॉम मंत्रालय तरी करून दाखवावे, असा टोला उपाध्येंनी लगावला आहे.

तौत्के चक्रवादळामुळे मुंबई, कोकणात सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी, त्यातच कोरोनाचे संकट आणि मुख्यमंत्री घरात बसले आहेत, असे ट्विट उपाध्ये यांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली, पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना असो अथवा पावसाने मुंबईला झोपडपल्याची घटना असो, त्यावेळी ते परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तिथून हलले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतले आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार ? असेही उपाध्येंनी म्हटले आहे.