कोरोना लस : SMS द्वारे सरकार कळवणार वेळ व ठिकाण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगभरात कहर केला असून, दुसरी लाट आली आहे. त्यामुळे जगभरातील सर्वच देश कोरोनावरील लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. एक चांगली बातमी समोर आली असून, जगभरात तीन कोरोना लशींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या लशी आपापल्या देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश सर्व ताकद पणाला लावू लागला आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जगातील सर्वांत मोठी लस बनविणारी कंपनी भारतातीलच आहे. यामुळे लस पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे कामाला लागली आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान, लशीच्या वितरणाबाबत चर्चा करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील लोकांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे.

मंगळवारी झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी लस कधी येईल हे आपल्या हाती नसल्याचे सांगितले. यात राजकारण करू नये, महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवावी, अशी मागणी केली आहे. यामुळे कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे.लस देण्यासंदर्भात काही टप्पे करण्यात आले असून, सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्संना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील, त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे.

पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार, याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात असून, यामध्ये कोरोना लशीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे.

एडर्नालाइन इंजेक्‍शनचा पुरेसा साठा करण्याच्या राज्यांना सूचना
कोरोना लस टोचणाऱ्या नागरिकांवर सरकार लक्ष ठेवणार आहे. यामुळे लोकांमध्ये लशीबाबत विश्वास वाढेल. लसीकरणाबाबत विविध समाजांमध्ये अंधश्रद्धा असते, यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम राज्य सरकारांवर सोपविण्यात आले आहे. याचबरोबर लशीच्या दुष्परिणामांसाठीदेखील तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्यामध्ये एडर्नालाइन इंजेक्‍शनचा पुरेसा साठा करण्याची सूचना देण्यात आली असून, लस दिल्यानंतर काही रिअअ‍ॅक्शन दिसल्यास लोकांना हे इंजेक्शन दिले जाणार आहे.

You might also like