तुमच्या घराजवळ कुठं आहे आधारकार्ड सेवा केंद्र ? ‘या’ ठिकाणी 2 मिनिटांत समजणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आधारकार्डमध्ये (Aadhhar Card) बदल करण्यासाठी तुम्हाला अनेकदा आधारकार्ड केंद्रामध्ये जावे लागते. अगदी आपला मोबाइल क्रमांक (Mobile number) अपडेट करायचा असेल, तर आधार सेवा केंद्रात जाण्याशिवाय पर्याय नसतो. याचबरोबर आधारकार्डवरील तुमच्या राहत्या घराचा पत्ता, जन्मतारीख आणि इतर कोणत्याही पद्धतीची माहिती ऑनलाइन पद्धतीने अपडेट करताना अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तर नजीकच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन त्या सोडवता येऊ शकतात. परंतु हे आधारकार्ड केंद्र तुमच्या घराजवळ कुठे आहे, याची माहिती असणेदेखील आवश्यक आहे. यासाठी अगदी सोपी पद्धत असून, घराजवळील आधारकार्ड केंद्र सापडण्यासाठी तुम्हाला केवळ हेल्पलाइन क्रमांक (Help Line Number) १९४७ यावर कॉल करायचा आहे. या हेल्पलाइनवर हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमीळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, बंगाली, आसामी आणि उर्दूसहित १२ भाषांमधून तुम्हाला माहिती मिळवता येऊ शकते. UIDAI ने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Aadhaar App चा वापर असा करावा

अँड्रॉइड मोबाईलसाठी गुगलच्या प्ले स्टोअरमधून तुम्ही हे अप डाउनलोड करू शकता. आयओएस मोबाईलसाठी आयओएस स्टोअरमधून हे अप डाऊनलोड करता येईल. या ॲपच्या माध्यमातून आधारशी संबंधित सर्व सुविधा आणि माहिती तुम्ही मिळवू शकता. यामध्ये तुमच्या जवळच्या आधार केंद्राची माहितीदेखील तुम्हाला मिळणार आहे.

UIDAI च्या वेबसाईटवर माहिती

आधार कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या ‘यूआयडीएआय’ संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊनही आधारकार्ड संबंधित माहिती मिळवता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही My Aadhaar टॅबमध्ये Locate an Enrolment Center या पर्यायावर क्लिक करून जवळच्या आधार केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.