माढा लोकसभा मतदार संघावर माझा दावा नाही

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याने या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे चर्चेला ऊत आला असून माजी आमदार राजन पाटील यांना उमेदवारी देण्याचाही पर्याय पुढे येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी ‘मी जिथे आहे, तिथेच समाधानी आहे. तसेच तो मतदारसंघ माझा नाही. मी माढ्यातून इच्छुकही नाही आणि तशी इच्छा देखील मी बोलून दाखवली नाही. त्यामुळे या ठिकाणी दावा करण्याचा व उभारण्याचा प्रश्न येत नाही’ असा खुलासा माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे.

पक्षाने मला भरपूर काही दिलेले आहे. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे. पक्षाच्या माध्यमातून माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवारांना सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर निवडून देण्याचे प्रामाणिकपणे काम करणार आहे. असेही ते म्हणाले. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात अनगरच्या पाटील कुटुंबीयांना मानणारा वर्ग आहे. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर विरोधकसुद्धा प्रचार करतील. सध्या हा एकच पर्याय आहे.

शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याबाबत चार दिवस सोशल मीडियावरून वेगवेगळे मेसेज येत आहेत. त्यामुळे यातून उमेदवारी कोणाला मिळणार हा विषय जिल्ह्यासह राज्यात उत्सुकतेचा बनला आहे.

Loading...
You might also like