महापालिकेच्या शाळा सुरू करायच्या की नाहीत ? येत्या एक-दोन दिवसांत निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीपाठोपाठ राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. संभाव्य दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अनलॉकनंतर २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करायच्या की नाहीत? याचा येत्या दोन दिवसांत फेरआढावा घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यात अनेक क्षेत्र अनलॉक करण्यात आली आहेत. राज्य शासनाने येत्या २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतही परवानगी दिली आहे. शासनाने पंधरा दिवसांपूर्वी यासंदर्भात घोषणा केल्यानंतर राज्य शासनाच्या गाइडलाइननुसार सर्व शाळांनी त्यानुसार तयारीही सुरू केली आहे. शाळांतील स्वच्छतेपासून अगदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना टेस्टही घेण्यास सुरुवात झाली आहे. अशातच दिल्लीपाठोपाठ अहमदाबाद आणि आपल्या राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.

शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे. पालकांचे लिखित संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही यासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील दोन दिवसांतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालकवर्गातूनही पाल्यांना शाळेत पाठविण्याबाबत नकारात्मक भावना दिसून येत आहे.

यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की रुग्णसंख्या वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाचे आदेश आणि शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन पुढील दोन दिवसांत सर्व घटकांशी चर्चा करून शाळा सुरू करायच्या की नाहीत? याबाबत निर्णय घेण्यात येईल.

महापालिकेच्या ९ ते १२ वीपर्यंतच्या १३ शाळा आहेत. या ठिकाणी ८ हजार ६३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि एसओपीनुसार विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायजेशन आणि हात धुण्यासाठीची यंत्रणा प्रत्येक शाळेत निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे.