पंकजा ताईंच्या शुभेच्छा स्वीकारताना धनंजय भाऊंनी लगावला खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या महाराष्ट्राने परळी विधानसभेचा थरार आणि जनमत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहिले होते. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच परळीतील भाऊ आणि बहीण एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. गहिनीनाथ गडाच्या निमित्ताने न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. पंकजा यांनी यावेळी धनंजय मुंडे यांना मंत्री पदाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या. पंकजा यांच्या शुभेच्छांचा देखील धनंजय मुंडे यांनी स्वीकार केला आहे.

शुभेच्छांचा स्विकार करताना मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना खोचक टोला देखील लगावला आहे ते म्हणाले, आजपर्यंत मला त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. कालही मला त्या ऐकायला मिळाल्या नाहीत. माध्यम आणि सोशल मीडियातून मला याबाबत समजलं. त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्याचा मला आनंद आहे. शेवटी उशिरा का होईना, वामनभाऊंच्या पदपस्पर्शाने पावन झालेल्या गहिनीनाथ गडावरती, त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली, मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे, तसेच या शुभेच्छा मला सतत सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतील असे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

यानंतर प्रसार माध्यमांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांनी त्यावर ‘नो कमेंट्स’ म्हणत भाष्य करणे टाळले.

फेसबुक पेज लाईक करा –