गोपीचंद पडळकरांना ‘जोड्यां’नी मारा मिळवा 50 हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते चांगलेच संतापल्याचे पहायला मिळत आहे. वंचितच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बॅनर लावले आहेत. गोपीचंद पडळकर यांना ‘जोड्या’ने मारा आणि 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळवा असे बॅनर लावले आहेत. हे बॅनर जालन्यातील ‘जय भीम सेना’ संघटनेने लावले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला. वंचितचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन आपण वंचितचे काम थांबवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर वंचितच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच आता जालन्यामध्ये त्यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहे.

धनगर समाजातील तरुणांचे ‘आयडॉल’ अशी पडळकर यांची प्रतिमा आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजाशी गद्दारी करु नका, कारण तुम्ही सांगितले होतं, धनगरांना जोपर्यंत एसटी प्रवर्गाचे आरक्षण आणि दाखला हातात मिळत नाही, तोपर्यंत भाजप नेत्याचे तोंड बघणारा नाही, असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यापूर्वीच म्हटले होते. जर भाजपा पदाधिकाऱ्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावणार नाही मग पद आणि सत्तेसाठी आता गद्दारी का ? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Visit : Policenama.com