बाईक चालवताना हेडफोन घालणे पडले महागात ; पत्नीला व्हिडीओ कॉल करुन घेतला अखेरचा श्वास !

पाटणा : वृत्तसंस्था – बाईकवरुन प्रवास करताना हेडफोन वापरल्यामुळे बिहारमधील बेगुसराय येथील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. बाईक चालवताना हेडफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा आवाज या युवकाला न आल्याने, भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने तरुणाला चिरडले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघात आश्चर्याची म्हणजे गोष्ट म्हणजे या तरुणाने अपघातानंतर पत्नीला व्हिडीओ कॉल करून अखेरचा श्वास घेतला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता. कानात हेडफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा अंदाज या युवकाला आला नाही. चालकाने खूप वेळा हॉर्न वाजवले, पण तरुणाच्या लक्षातच आले नाही. त्यातच, ट्रकचालकाने गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात संबंधित दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. त्यामुळे गाडीसह तरुण रस्त्यावर पडला. त्यात त्याचे दोन्ही पाय ट्रकच्या पायाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. या गंभीर अवस्थेतही तरुणाने खिशातून मोबाईल काढून पत्नीला व्हिडीओ कॉल केला. आणि पत्नीला पाहून शेवटचे शब्द बोलत अखेरचा श्वास घेतला.

या तरुणाचा असा दुर्दैवी आणि मन हेलावणारा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे. राजाराम पंडित असे या युवकाचे नाव असून तीन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. राजारामला एक 7 महिन्यांची मुलगीही आहे. आपल्या मेव्हण्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी सासूरवाडीकडे निघाला होता. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अति रक्तश्रावामुळे त्याचा जीव गेला.