पतीनं अमेरिकेतून भारतातील पत्नीचा केला ‘गेम’, खूनाचं कारण जाणून बसेल ‘धक्का’

चेन्नई : वृत्तसंस्था – अमेरिकेत राहणाऱ्या पतीने आपल्या मेव्हुण्याच्या मदतीने सुपारी देवून पत्नीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतून समोर आली आहे. मृत महिला दुचाकीवरून आपल्या कार्यालयातून घराकडे जाताना आरोपीने भरधाव ट्रक चालवत त्यांना चिरडले आहे. तामिळनाडूतील तिरुवरुर परिसरातील किदरकोंडम येेथे ही घटना घडली आहे. आरोपीने हा अपघात असल्याचा बनाव केला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टीकला नाही. पोलिसांनी अवघ्या काही तासातच हत्येचा उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाच्या टोळीला अटक केली.

जया भारती असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक मालक सेंठीकुमारसह जगन, प्रसन्न आणि राजा अशा चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जया भारती यांचे 2015 मध्ये विष्णूप्रकाश सोबत विवाह झाला होता. गेल्या पाच वर्षांपासून विष्णूप्रकाश अमेरिकेत एका आयटी कंपनीत नोकरी करत आहे. मृत जया आपल्या पतीसोबत अमेरिकेतचं राहत होती. मात्र दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर ती भारतात परतली होती. येथे दोघांच्या नातेवाईकांनी यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण फारसा फायदा झाला नाही. शेवटी जयाने पतीला घटस्फोटासाठी नोटीस बजावली. पण घटस्फोट झाल्यानंतर पोटगी द्यावी लागेल या भीतीने त्याने आपल्या मेव्हुण्याच्या मदतीने एका ट्रक चालकांच्या टोळीला पत्नीच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. दरम्यान जयाभारती 21 मे रोजी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने कामावरुन घरी जात होत्या. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. घटनेनंतर वाहनचालकांने घटनास्थळावरुन पोबारा केला होता.

अपघाताचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जयाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जयाच्या कुटुंबीयांना या अपघाताबाबत शंका आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पहाणी केली. तसेच प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेतली. या माहितीच्या आधारावर मृताच्या कुटुंबींयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी हत्येचे गूढ उलगडलं असून या घटनेचे धागेदोर अमेरिकेपर्यंत जोडले आहेत.