6000 रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमीनीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जुन्नर तालुक्यातील सजा गोळेगाव येथील तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज जुन्नर एसटी स्टँड जवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचून करण्यात आली. विश्वनाथ मुगदळे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमीनीची नोंद 7/12 उताऱ्यावर घेण्यासाठी तसेच फेरफारमध्ये नोंद गेण्यासाठी सजा गोळेगांव येथील तलाठी मुगदळे याने तक्रारदाराकडे 6 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठी मुगदळे याने एसटी स्टँड जवळील हॉटेलमध्ये लाच स्विकारण्याचे कबुल केले. पथकाने सापळा रचून तलाठी मुगदळे याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com