‘सफेद चिप्पी’ कांदळवन वृक्ष म्हणून घोषित !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पार पडली. या बैठकीत ‘सफेद चिप्पी’ या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. असा वृक्ष घोषित करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन्य, आणि जंगल संवर्धनासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. म्हणून राज्य वन्यजीव मंडळाच्या पुढील बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तवासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील, ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद करणे आवश्यक राहील, अशा प्रस्तावांचा पुढील वेळी विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी म्हटलं. या बैठकीस वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार धीरज देशमुख यांच्यासोबत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश…
चंद्रपूर जिल्हातील वाघांच्या स्थलांतराबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हा विषय हाताळला पाहिजे असे सांगून त्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मानव- वन्यजीव सहजीवन विकसित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात यासाठी होत असलेल्या उपाय योजनांचा अभ्यास केला जावा, त्यासाठी एक परिषद घेऊन एकत्रित विचारातून हा मार्ग निश्चित करावा असे सांगितलं.

पर्यावरणाचे नुकसान करुन प्रकल्प राबवू नये…
राखीव वने आणि जंगले यांचा प्रस्ताव सादर करतेवेळी अथवा एखाद्या क्षेत्राला राखीव क्षेत्र घोषित करताना प्रकल्प आणि नागरिकांचे मत काय असेल यावर अभ्यास केला जावा. पर्यावरणाची किंमत मोजून, जंगलाचे नुकसान करुन प्रकल्प राबविण्याचे कोणतेही सोपे मार्ग निवडण्यात येऊ नयेत म्हणून जेव्हा अकोला- खांडवा मित्र गेज रेल्वेलाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा मेळघाट मधून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग बदलण्याचे राज्याचे मत केंद्र सरकारला कळविण्यात आले. हा पर्यायी मार्ग निवडल्यास वाघ व वन्यजीवांचे संरक्षण तर होईलच तसेच बरीच नागरी वस्ती कव्हर होईल आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळू शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वन्यजीव उपचार केंद्रे सुरु करावीत…
राज्यात जंगलाचे प्रमाण वाढवण्याचे आवश्यक असल्याचे म्हणत, मुंबईतील फ्लोमिंगो, ठाणे क्रिक अभयारण्याचे क्षेत्रही आपल्याला वाढवायचे आहे. कासवांचे जिथे जिथे संरक्षण करता येईल तिथे कासव संवर्धन प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यात वन विभागाच्या सर्कसलमध्ये जिथे वन्यजीव उपचार केंद्रे आहेत ते सोडून अन्य ठिकाणी असे संक्रमण उपचार केंद्रे तातडीने सुरु करावीत, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वन्यजीव प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध करुन घेण्याबतचे पत्र रद्द करावे, असे सुद्धा त्यांनी म्हटलं.

समर्थनासह मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव वन्यजीव मंडळाने केला मंजूर…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेळघाट व्याघ्र राखीव मधून जाणाऱ्या अकोला ते खांडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात परिवर्तन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याबद्दल केंद्र सरकारला आपले मत कळवले होते. त्यांच्या या मताचे समर्थन करताना राज्य वन्यजीव मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज एकमुखाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

महाराष्ट्रात वाघांची जपणूक होत आहे पण त्याचबरोबर जलचरांकडेही वन विभाग लक्ष देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात सुंदर वनसंपदे प्रमाणे समृद्ध जलसृष्टी ही आहे. आपण त्याकडे कसे पहातो हे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सागरतटावर कांदळवने देत असलेल्या नैसर्गिक सुरक्षेचा अभ्यास करण्याची सुचना दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like