‘जिथं सचिन तेंडुलकरला ट्रोल केलं जातं तिथं मी कोण हो?’ – अभिनेत्री हेमांगी कवी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   रोखठोक बिनधास्त अंदाजामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने सोशल मीडिया फेसबुकवर ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या पोस्टमधून काही जण तिची बाजू घेत आहेत तर काही तिच्यावर टीका करताना दिसत आहे.

हेमांगी कवीने फेसबुकवर लिहिले की, “जिथे सचिन तेंडुलकर सारख्या भारतरत्नाला काही मूर्ख, कर्तृत्व नसलेले लोक त्याला कोरोना झालाय, त्याच्या प्रकृतीबद्दल वाट्टेल ते बोलतायेत, ट्रोल करतायेत तिथे मी कोण हो? ज्यांना , मला ट्रोल केलं जातंय आणि त्यामुळे मला त्रास होईल किंवा होतोय वगैरे असं वाटतंय त्यांनी निर्धास्त रहावे. मी पूर्णपणे बरी आहे. तुमच्या काळजी आणि पाठिंब्यासाठी मी आभारी आहे.” त.टी. : सचिन आपला वाटतो म्हणून एकेरी संबोधलंय!

ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच समाजात होत असलेल्या घटनांविषयी सोशल मीडियाद्वारे तिचे रोखठोक मत मांडत असते. त्यामुळेच तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. हेमांगी कवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने ‘फक्त लढ म्हणा’, ‘डावपेच’, ‘कोण आहे रे तिकडे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘ठष्ट’, ‘ती फुलराणी’ या नाटकांमधील तिच्या भूमिकेचे तर खूपच कौतुक झाले आहे. सध्या ती स्टार भारत वाहिनीवरील ‘तेरी लाडली मैं’ या मालिकेत काम करते आहे.