Coronavirus : ‘भारतातील परिस्थिती विदारक ! 2600 तज्ज्ञ भारतात पाठवणार’; कोरोना स्थितीवर WHO ने केलं पहिल्यांदाच भाष्य

जिनव्हा : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर दोन हजारारून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एक वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचे म्हटले आहे. भारतातील कोरोना संकट गंभीर होत असतानाच जागितक आरोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आलं आह. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासाठी धावपळ करावी लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र दिल्ली, कर्नाटक अशा अनेक राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले आहेत. तसेच हजाराहून अधिक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाईल फील्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा पुरवठा जगतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे, असेही टेड्रोस यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्त्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. कोरोना संकटाशी सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून 2600 तज्ज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचंही टेड्रोस सांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, टेड्रोस यांनी जगातील कोरोना रुग्णसंख्या सलग नवव्या दिवशी वाढण्यावरुन चिंता व्यक्त केली. पाच महिन्यात जितके रुग्ण आढळून आले होते तितक्या रुग्णांची गेल्या एका आठवड्यात नोंद झाली असल्याचे सांगत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य सांगितले. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतात वेगाने होणारी रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत असून जागतिक रुग्णसंख्येत मोठा वाटा उचलत आहे.