Coronavirus : लक्षणं नसलेला ‘कोरोना’चा रूग्ण देखील करू शकतो इतरांना संक्रमित, WHO नं आता दिलं स्पष्टीकरण

संयुक्त राष्ट्र : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असिंप्टोमॅटिक कोरोना रूग्णांबाबत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले होते की, असिंप्टोमॅटिक (लक्षणे नसलेला) संक्रमितांकडून महामारी पसरण्याचा धोका खुपच कमी आहे. परंतु, आता जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, असे लोक सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरवू शकतात. ज्यामध्ये आजराची लक्षणे दिसत नाहीत. अशा संसर्गाला प्री-सिंप्टोमॅटिक म्हणतात.

सामान्यपणे व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात. परंतु यामध्ये 14 दिवसाचा वेळ सुद्धा लागू शकतो. याशिवाय आकडे हे सुद्धा सांगतात की, पीसीआर टेस्टद्वारे लक्षणे दोन-तीन दिवस आधी ओळखता येऊ शकतात. प्री-सिंप्टोमॅटिक संसर्ग तेव्हा होतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा व्यक्तीकडून संसर्ग होतो ज्यामध्ये लक्षणे दिसत नाहीत. अनेक लोकांमध्ये संसर्ग असूनही व्हायरसची लक्षणे दिसत नाहीत, परंतु असे लोकसुद्धा दुसर्‍यांना संक्रमित करू शकतात.

अमेरिकेच्या निशाण्यावर जागतिक आरोग्य संघटना

कोरोना महामारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरून थेट हल्ला केला होता. त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, डब्ल्यूएचओ चीनच्या प्रभावाखाली काम करत आहे. अमेरिकेने डब्ल्यूएचओला देण्यात येणार्‍या निधीवर सुद्धा प्रतिबंध लावला आहे. मात्र, अमेरिकेने असे केल्यानंतर काही दिवसानंतर चीनने डब्ल्यूएचओला मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले. चीनच्या या वक्व्यानंतर अमेरिकेच्या आरोपांना बळ मिळाले आहे.

मास्कच्या वापरावरून वाद

मास्कच्या वापरावरून सुद्धा डब्ल्यूएचओच्या गाइडलाईन्सवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हे महत्वाचे आहे की, जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोना पसरल्यानंतर सुद्धा डब्ल्यूएचओने मास्कच्या वापरावर जास्त जोर दिला नव्हता. नुकतीच डब्ल्यूएचओने मास्कसंबंधी नवी गाइडलाईन जारी केली आहे. परंतु यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कवर विश्वास ठेवता येणार नाही.

जागतिक रूग्णसंख्या 71 लाखांच्या पुढे

जगभरात कोरोनाचे एकुण 71 लाखांपेक्षा जास्त रूग्ण सापडले आहेत. आतापर्यंत महामारीमुळे जागात चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. सर्वात जास्त लोक अमेरिकेत संक्रमित झाले आहेत. देशात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 20 लाखांच्यावर आहे. 7 लाखांपेक्षा जास्त संक्रमितांसह ब्राझील यावेळी जगात कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. याबाबत डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे.