Coronavirus : WHOनं आयुष्यमान भारत योजनेचं केलं ‘कौतुक’, भारताच्या प्रयत्नांबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारताच्या आयुष्मान भारत योजनचे कौतूक करताना म्हटले की, याच्या अंमलबजावणीचा वेग वाढवून देश कोविड-19 ला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. डब्ल्यूएचओने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे देखील कौतूक केले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले की, भारतात संसर्ग खुप जास्त वेगाने पसरत नाही, परंतु त्याची जोखीम कायम आहे. यासाठी सावध राहाणे आवश्यक आहे.

डब्ल्यूएचओने शुक्रवारी एक रिपोर्ट रिलिज केला ज्यामध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाच्या केस तीन आठवड्यात दुप्पट झाल्या आहेत, रूग्ण सतत वाढत आहेत. भारतच नव्हे, तर बांग्लादेश, पाकिस्तान आणि दक्षिण आशियातील जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सुद्धा आता महामारीची स्थिती अजून स्फोटक झालेली नाही. परंतु, असे होण्याची जोखीम कायम आहे. डब्ल्यूएचओने यासाठीही सावध केले की, जर सामाजिक स्तरावर संसर्ग सुरू झाला तर तो खुप वेगाने पसरू शकतो.

डब्ल्यूएचओने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे, यामुळे संसर्ग वाढण्याची भिती आहे. प्रवाशांची संख्या जास्त होणे, शहरी भागातील गर्दी आणि अनेक लोकांकडे रोज कामाला जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसणे, असे मुद्दे सुद्धा आहेत.