‘करोना’ विरुद्ध जग सरसावले, WHO कडून जागतिक आणीबाणीची घोषणा

वुहान : वृत्तसंस्था – चीनमधील यूबेई प्रांतातील वुहान शहरात मूळ असलेल्या ‘करोना’ विषाणू हळूहळू जगभर पसरत आहे. अनेक देशांत ‘करोना’ बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. चीनमध्ये 213 बळी पडले असून10 हजार जणांना याची लागण झाली आहे. ‘करोना’ या जीवेघण्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आता जग सरसावलं आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणीबाणी घोषित केली आहे.

‘करोना’ चे रुग्ण जगभरात सापड असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहेत. तर काही देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांवर प्रवेशबंदी केली आहे. काही दिवसापूर्वी WHO ने ‘करोना’चा मोठा धोका नसल्याचे म्हटले होते. मात्र परिस्थिती पाहाता ‘हू’ ने आपली भूमिका बदलली आहे. ‘करोना’ला अटकाव करण्यासाठी जगभर आणीबाणी घोषित केली आहे. आरोग्यवस्थेची स्थिती बेताची असलेल्या देशात ‘करोना’चा फैलाव वेगानं होऊ शकतो अशी भीती ‘हू’ चे प्रमुख टेड्रॉस गेब्रेसस यांनी व्यक्त केली आहे.

टेड्रॉस यांनी सांगितले की, केवळ चीनमधून येणाऱ्या व जाणाऱ्यांवर निर्बंध लादून हा व्हायरस रोखता येणार नाही. कारण 15 हून अधिक देशांतील नागरिकांना आधीच याची लागण झाली आहे. ‘करोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांना एकजुटीने काम करण्याची गरज आहे. एकत्र येऊनच या संकटाला थोपवले जाऊ शकते.

‘करोना’ म्हणजे काय ?
सध्या सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्स सारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूच्या गटला ‘करोना’ म्हणतात. हा नवा विषाणू ‘एनसीओवी’ (Novel Corona Virus 2019 (nCov) असल्याचे सिद्ध झाले आहे. 2003 मध्ये आढळलेला सार्स हा देखील एक प्रकारचा ‘करोना’चा होता.

‘करोना’ आजाराची लक्षणं
सर्दी, खोकला
तीव्र ताप
श्वास घ्येण्यास त्रास होणे
न्यूमोनिया
अतिसार
काही रुग्णांमध्ये मुत्रपिंड निकामी होणं
प्रतिकारशक्ती कमी होणं