शरद पवारांच्या माघारीनंतर माढ्यात मोहिते पाटील की प्रभाकर देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसांघातून घोषित केलेली उमेदवारी माघारी घेतली आहे. त्यानंतर आता माढ्यात कोण असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या माघारी नंतर माजी भाप्रसे प्रभाकर देशमुख यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. तर मोहिते पाटलांचे पारडे अद्यापही जडच आहे असे एकूण राजकीय परिस्थिती वरून दिसते आहे.

माढा मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक असे उघड दोन गट आहेत. त्या गटबाजीलाच मूठमाती देण्यास आपण माढ्यात उमेदवारी करत आहे असे असे शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी घोषित केल्या नंतर दर्शवले होते. मात्र शरद पवार यांनी अचानक उमेदवारी वरून माघार घेतल्याने आता माढ्यात राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेतो आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार की त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार या बाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान प्रभाकर देशमुख हे देखील आता पुन्हा आपला दावा माढा मतदारसंघावर सांगणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रभाकर देशमुख यांनी निवृत्ती घेतल्यानंतर माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरु केली होती. तेव्हा विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधी गटाने प्रभाकर देशमुख यांना प्रोत्साहन दिले होते. पण मधल्या काळात शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रभाकर देशमुख यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले होते. मात्र आता पवारांनी माघार घेतल्यावर ते पुन्हा उमेदवारीची मागणी करण्याची शक्यता बळावली आहे.