100 कोटीच्या हप्ता वसुलीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्‍या अ‍ॅड. जयश्री पाटील आहेत तरी कोण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी हप्ता वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या कथित आरोपामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आता हे प्रकरण CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुखांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यामुळे पाटील हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जयश्री पाटील यांचे नाव यापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणातही चर्चेत आले होते.

गृहमंत्री देशमुखांवरील आरोप प्रकरणाचा संपूर्ण तपास करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने CBI च्या प्रमुखांना दिले आहेत. देशमुख हे गृहमंत्री असल्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याबाबत हायकोर्टाने शंका देखिल उपस्थित केली होती. अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे नाव प्रकरणापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणात चर्चेत आले होेते. त्या स्वतः मराठा समाजातल्या आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून पाटील यांनी विरोध केला आहे. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकार या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत. तसेच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.