‘लॉकडाऊन’मध्ये सेलिब्रिटींच्या पार्ट्यांना कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद ? CBI चौकशीची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येहे सेलिब्रिटी पार्ट्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्ट्यांमागचा बोलवता धनी कोण आहे ? यामागे मंत्री आहेत की अधिकारी ? या संपूर्ण प्रकणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी ट्विटमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या दिशेने सूचक इशारा केला आहे. परंतु सरकारमधील मंत्र्याचं थेट नाव घेण टाळल्याने सरकारमधील हा मंत्री कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये मोजक्याच पण सूचक शब्दात ट्विट केलं आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वारंवार सेलिब्रिटी पार्ट्यांचा उल्लेख होतोय. लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाला आईच्या अंत्यसंस्कारालाही जाण्याची मुभा नव्हती, अशा वेळी सेलिब्रिटी पार्ट्या कुणाच्या आशिर्वादाने सुरु होत्या ? मंत्र्याच्या ? की अधिकाऱ्यांच्या ? असा सवाल करतानाच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. शेलार यांच्या या ट्विटमुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सुशांतच्या प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झापले आहे. ज्यांच्या कुणाकडे या प्रकरणाचे पुरावे असतील तर त्यांनी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावेत आणि त्यांना सहकार्य करावे. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊ नये, असे सांगत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर सुशांतची केस लढवणारे वकील विकास सिंह यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना कायद्याची समज नाही. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. हे गुन्हेगारी प्रकरण असून फिर्यादी पक्षाने तक्रार करायची नसून सत्य बाहेर आणायचं असतं असे सिंह यांनी म्हटले आहे. मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपास करू शकली नाही. सुशांतच्या आसपास असणाऱ्या व्यक्तिंचाही तपास करण्यात आला नाही. आता हे काम बिहार पोलीस पूर्ण करतील असे त्यांनी म्हटले आहे.