कोण दुर्योधन अन् कोण अर्जुन हे २३ तारखेला समजेल : अमित शहा

कोलकाता : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर देत मोदींना अहंकारी म्हणत त्यांची तुलना दुर्योधनाशी केली. यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले आहे. २३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? असे अमित शहांनी म्हटले आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

प्रियंका गांधींवर पलटवार करताना अमित शहा म्हणाले की ,’ प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून कुणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे, २३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन?’

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी –

‘अहंकारी व्यक्तीच्या पाडावाची इतिहास आपल्याला साक्ष देतो, महाभारतात जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा दुर्योधनाने त्यांनाच बंदी बनविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी कृष्णाच्या विशाल रुपासमोर दुर्योधनाचा अहंकार नष्ट झाला होता.’असे सांगत त्यांनी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील काही ओळी वाचून दाखवल्या.
जब नाश मनुष्यपर छाँता है, पहले विवेक मर जाता है
हरीने भीषण हुँकार किया, अपना स्वरुन विस्तार किया
डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले,
रणधीर बडाकर सांज मुझे, हाँ.. हाँ.. दुर्योधन बांध मुझे.