मोदींची छत्रपतींशी तुलना करणारे कोण आहेत ‘महाभाग’ जय भगवान गोयल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एकेकाळी शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करणारे जय भगवान गोयल हे पाच वर्षापूर्वी भाजपामध्ये सहभागी झाले असून त्यांनी प्रकाशित केलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. जय भगवान गोयल हे एकेकाळी शिवसेनेचे प्रमुख नेते होते.

गोयल यांचा जन्म ६ ऑक्टोंबर १९५९ मध्ये लुधियानात झाला आहे. ते सध्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे महाराष्ट्राबाहेरील गाजलेले पहिले शिवसैनिक आहेत. पंजाब जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची १९८२ ते १९८७ म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर दक्षिण दिल्लीचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांची १९८८ ते १९९० दरम्यान नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पूर्व उत्तर आणि दिल्लीचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून शिवसेनेने त्यांची नेमणूक केली होती.

महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना अमानुष वागणूक दिली जात असल्याच्या कारणावरुन त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत स्वत:ची राष्ट्रवादी शिवसेना २००८ मध्ये स्थापन केली. नरेंद्र मोदी यांचा झंझावात सुरु झाल्यावर त्यांनी आपल्या समर्थकांसह २०१४ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

जय भगवान गोयल हे भाजपात गेले असले तरी ते शिवसेनेचा उत्तर भारतातील चेहरा म्हणून अधिक प्रसिद्ध होते. राष्ट्रवादी भूमिकेतून त्यांनी दिल्लीत अनेक आंदोलने केली. त्याला देशभर प्रसिद्धी मिळाली होती. युनायटेड हिंदू फ्रंट या समितीच्या खाली त्यांनी दिल्लीतील सर्व हिंदू संघटनांचा समूह बनविला आहे. याफ्रंटचे ते आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत. या संघटनेद्वारे हिंदुचे सणवार, विशेष दिवस साजरे केले जातात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/