छत्तीसगढ एन्काऊंटर : कोण आहे कुख्यात नक्षली हिदमा? ज्यास मानलं जातंय एन्काऊंटरचा मास्टरमाईंड, झालेत 22 जवान शहीद !

नवी दिल्ली : शनिवारी छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले तर 31 जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी सुकमा-बीजापुर बॉर्डरवर ऑपरेशन सुरू केले होते ज्यानंतर अनेक तास चाललेल्या गोळीबारात इतके जवान शहीद झाले. हे अभियान सुरू करण्यामागे एक गुप्त माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांना अशी माहिती मिळाली होती की, पाहिजे असलेला नक्षली नेता हिदमा छत्तीसगढच्या जंगलात लपला आहे. हिदमा हाच शनिवारच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जात आहे.

वृत्तानुसार, जिथे हे अभियान राबवण्यात आले तिथे अगोदरपासूनच नक्षल्यांचे गट प्रतिक्षा करत होते आणि सुरक्षा दलाचे जवान पोहचताच त्यांच्यावर तीन तासापर्यंत जोरदार गोळीबार करण्यात आला.

कोण आहे हिदमा उर्फ हिदमन्ना?
हिदमाचे वय 40 वर्षांच्या जवळपास आहे आणि तो सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावातील आदिवासी आहे. तो 90 च्या दशकात नक्षली बनला. तो पीपल्स लिब्रेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) च्या बटालियन नंबर 1 चा प्रमुख आहे. हिदमा भयंकर आणि घातक हल्ल्यांसाठी ओळखला जातो. हिदमा सुमारे 180 ते 250 नक्षलींच्या गटाचा प्रमुख आहे, ज्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे.

हिदमाचे अलिकडच्या काळातील एखादे छायाचित्र सुद्धा उपलब्ध नाही. त्याच्यावर 40 लाख रूपयांचे बक्षीस आहे, हिदमा किती भयंकर आणि कुख्यात आहे याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो.

एनआयएने सुद्धा हिदमा विरूद्ध मांडवी मर्डर केसमध्ये चार्ज शीट फाईल केली आहे. भीमा मांडवी भाजपा आमदार होते. एप्रिल 2019 मध्ये दंतेवाडामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता, ज्यामध्ये ते, त्यांचा ड्रायव्हर आणि तीन सुरक्षा कर्मचारी मारले गेले होते.

वृत्तानुसार, शनिवारी सुद्धा पीएलजीए बटालियन आपला कमांडर हिदमाच्या नेतृत्वातच काम करत होती. मागच्या वर्षी सुद्धा नक्षल्यांनी सुकमाच्या मिनापामध्ये असाच हल्ला केला होता, ज्यामध्ये 22 जवान शहीद झाले होते.