‘तो’ फोटो काढणारा फोटोग्राफर कोण ? काय आहे यामागील राजकीय हेतू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजप मध्ये जाण्याचे सत्र सध्या सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या एका गुप्त बैठकीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर हे दोघेही भाजपच्या वाटेवर असून त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाल्याचे स्पष्ट झाले.

हे दोघेही बडे नेते असून चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा असून काँग्रेसचे कोळमकर हे सातवेळा विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार ३० जुलै ला ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

ही एक गुप्त बैठक होती तरिही या बैठकीचा फोटो काढून व्हायरल झाल्याने यावर सोशल मिडियावर दावे प्रतिदावे करण्यात येत असून चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी मध्यरात्री मुंबईतील चंद्रकांत पाटील यांच्या घरात हि बैठक घेतली गेली असून तेथेच हा फोटो काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेच शुक्रवारी आमदार कोळमकर आणि चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकल्या.

अशा प्रकारे फोटो लीक करून विरोधी पक्षांवर दबाव टाकण्यासाठी त्याचा फायदा करून घेतला जाऊ शकतो तसेच संबंधित नेत्याची त्याच्या पक्षातील विश्वासाहर्तता कमी करण्याचा आणि पर्यायाने ताकद कमी करण्याचा हेतू असतो.

याआधीही झाला होता असा प्रकार
भाजपमध्ये अशा प्रकारचा प्रकार याआधी गोपीनाथ मुंडेंच्या काळातदेखील झाला होता. मुंडे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांना भेटल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीयो लीक झाला होता. त्यावेळीदेखील मोठी खळबळ माजली होती. हा व्हिडीयो भाजपच्या एका नेत्यानेच लीक केला होता.

सध्या तरी हा फोटोग्राफर कोण आणि कोणाच्या इशाऱ्यावर हा फोटो व्हायरल झाला याबद्दल मोठी उत्सुकता आहे. तसेच याचा राजकीय फायदा कोण आणि कसा करून घेतो हेदेखील औत्सुक्याचे ठरेल.