रोशनी नाडर : देशातील सर्वात श्रीमंत महिला, ज्या बनल्या HCL च्या नव्या अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर मल्होत्राने तिचे वडील शिव नाडर यांची जागा घेतली आहे. आता ती एचसीएल कंपनीची नवीन अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण रोशनीने आपल्या क्षमतेच्या जोरावर जगात एक ठसा उमटविला आहे. वडिलांची एकुलती एक मुलगी रोशनी नाडर 38 वर्षांची आहे. ती दिल्लीत वाढली. दिल्लीतील सुप्रसिद्ध पब्लिक स्कूल वसंत व्हॅलीमध्ये तिने शिक्षण घेतले.

सुरुवातीच्या टप्प्यात ती रेडिओ / टीव्ही / चित्रपटाकडे अधिक आकर्षित झाली होती. या कारणास्तव, तिने अमेरिकेत जाऊन नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. शिक्षण संपल्यानंतर तिने एका वाहिनीमध्ये इंटर्नशिप करण्यास सुरवात केली. तेथून तिने लंडनच्या स्काई न्यूजमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून ती भारतात परतली. त्यानंतर तिने बिजनेस अडमिनिस्ट्रेटिव्हसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. रोशनीने एचसीएलमध्ये जाण्यापूर्वी विविध कंपन्यांमध्ये काम केले.

त्यानंतर एचसीएलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एका वर्षाच्या आत तिची पदोन्नती एचसीएल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. वयाच्या 27 व्या वर्षी रोशनी नादर 2009 मध्ये कंपनीची सीईओ बनली. असे म्हणतात की, तिने अध्यक्ष होण्यापूर्वीच कंपनीची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. त्यानंतर 2010 मध्ये तिने एचसीएल हेल्थ केअरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या शिखर मल्होत्राशी लग्न केले. आता रोशनीला दोन मुले आहेत.

प्रतिष्ठित फोर्ब्स मासिकाने रोशनी नाडरचे नाव 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षात जगातील सर्वात बलाढ्य महिलांच्या यादीत ठेवले आहे. रोशनी केवळ व्यवसायाच्या क्षेत्रातच नव्हे तर संगीताच्या क्षेत्रातही कार्यरत आहे. तिने शास्त्रीय संगीत शिकले आहे. ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी देखील एक संस्था चालवते. विद्याज्ञान असे नाव असलेल्या या अकादमीचे ती अध्यक्षही आहेत. तिने आता एचसीएल अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारून काम सुरू केले आहे.