International Woman’s Day 2020 : कोण आहेत स्नेहा मोहनदास, ज्यांच्याकडे PM मोदींनी त्यांचं ट्विटर अकाऊंट सोपवलंय, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर अकाऊंट चेन्नईमधील बेघरांना मोफत जेवण देणाऱ्या स्नेहा मोहनदास यांच्याकडे सोपवले आहे. स्नेहा त्या सात महिलांपैकी एक आहेत ज्यांनी पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या जीवनाचा वृत्तांत लोकांसमवेत शेअर केला.
स्नेहा मोहनदास फूड बँक इंडियाच्या संस्थापिका आहेत आणि त्याचबरोबर त्या बिग इव्हेंटच्या सीईओ आणि संस्थापिका आहेत. त्यांनी एक डबिंग आर्टिस्ट म्हणून देखील काम केले आहे. स्नेहा यांनी चेन्नईच्या एथिराज कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली आहे. तर अन्नामलाई विद्यापीठातून सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
स्नेहा मोहनदास यांनी पीएम मोदीच्या ट्विटर अकाऊंटवर आपली कहाणी सांगत लिहिले की, ‘तुम्ही थॉट फॉर फूड बद्दल ऐकले असेलच. आता याच्यावर काम करण्याची आणि गरिबांना चांगले भविष्य देण्याची वेळ आता आली आहे. मला माझ्या आईकडून प्रेरणा मिळाली ज्याने बेघरांना अन्न देण्याची सवय लागली.’
स्नेहा मोहनदास यांनी लिहिले की मी फूडबँक इंडिया नावाची मोहीम सुरू केली. भूक मिटविण्यासाठी मी स्वयंसेवकांसोबत काम केले, त्यापैकी बहुतेक विदेशात राहतात. आम्ही २० पेक्षा अधिक सभा घेतल्या आणि आमच्या कार्याद्वारे बर्याच लोकांना प्रभावित केले.
आम्ही एकत्र मिळून स्वयंपाक, पाककला मॅरेथॉन, स्तनपान जागरूकता यासारखे विविध उपक्रम सुरू केले. मला खऱ्या अर्थाने तेव्हा आनंद होतो जेव्हा मी असे काही करते ज्याचा मला छंद आहे. मला आपल्या देशातील नागरिकांना, विशेषत: महिलांना पुढे येऊन माझ्याशी हातमिळवणी करण्यासाठी प्रेरित करावेसे वाटते. मी प्रत्येकाला विनंती केली आहे की कमीतकमी एखाद्या गरजू व्यक्तीला तरी अन्न द्यावे.
पंतप्रधानांनी याआधीच्या आपल्या एका ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिले होते की, आम्ही महिला शक्तीच्या भावना आणि क्षमतांना सलाम करतो. जसे की काही दिवसांपूर्वी मी म्हटले होते, मी साइन आउट करत आहे. माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे उपलब्धी मिळवणाऱ्या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील प्रवासाविषयी सांगतील आणि आपल्याशी बोलतील.