महाराष्ट्रातील ‘तो’ आठवा मंत्री कोण ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ५८ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर कोणत्या नेत्याला काय खाते मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार दुपारी मोदींनी खातेवाटपाची घोषणा केली. या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण ७ मंत्रीपदे आली आहेत. यात ३ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे आहेत. त्यातील ४ मंत्री हे गेल्या सरकारमधील कायम ठेवण्यात आले आहेत. तर तीन नव्या मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राला आठ मंत्रिपदं मिळालेली आहेत.

चार कॅबिनेट मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा समावेश आहे. तर राज्यमंत्र्यांमध्ये रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोतरे यांचा समावेश आहे. मग तांत्रिकदृष्ट्या तो आठवा मंत्री कोण असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे. व्ही. मुरलीधरन

केरळमधील असलेल्या मुरलीधरन यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र फार कमी लोकांना हे ठाऊक असेल कि, व्ही. मुरलीधरन हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. एप्रिल २०१८ मध्ये त्यांना भाजपनं महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून दिलं होतं. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्राला ८ मंत्रिपदं मिळालेली आहेत.

दरम्यान, व्ही. मुरलीधरन हे जरी महाराष्ट्रातुन राज्यसभेवर गेले असले तरी त्यांची महाराष्ट्रातील मंत्र्यांमध्ये मोजणी होणार कि, केरळमधील हे अद्याप माहित नाही.