पुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण हवा….

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेसाठी पुण्यात आपल्या पक्षाचा उमेदवार कोण हवा अशी विचारणा काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांकडे सुरु केली आहे आणि त्यासाठी आजपासून डिजीटल तंत्राचा वापर अमलात आणला आहे.

ज्या कार्यकर्त्यांनी प्रोजेक्ट शक्ती अ‍ॅपद्वारे नोंदणी केली आहे त्यांना खर्गे यांच्याकडून एसएमएसद्वारे विचारणा केली जाते की, पुण्यातून उमेदवार कोण हवा? त्यानंतर बीप् वाजतो. बीप् वाजल्यानंतर कार्यकर्त्याने फोनवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नांव सांगितल्यावर तो ऑडिओ रेकॉर्ड होतो. अशा प्रकारे कार्यकर्त्यांचा कल आजमावण्यास आज दुपारपासून सुरुवात झाली आहे. या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे.

प्रदेश काँग्रेस समितीने मोहन जोशी, अभय छाजेड आणि अरविंद शिंदे यांच्या नावांची शिफारस केली आहे. मात्र, बाळासाहेब शिवरकर, आमदार अनंत गाडगीळ हे इच्छुकांमध्ये आहेतच. खेरीज पृथ्वीराज चव्हाण, संजय काकडे यांचीही नांवे चर्चेत आहेतच. त्यामुळे कार्यकर्ते कोणाचे नांव सुचवितात याची उत्सुकता आहे.

राजस्थान आणि मध्यप्रदेशातील मुख्य मंत्री निवडताना हीच पद्धत काँग्रेस पक्षाने वापरली होती. आता लोकसभा निवडणुकीसाठी त्याच धर्तीवर चाचपणी चालू झाली आहे.