आघाडी झाल्यास ‘पर्वती’त कोण? काँग्रेस की राष्ट्रवादी….

पुणे :पोलीसनामा आॅनलाईन

लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षाचे आठ -दहा इच्छुक कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुका त्यानंतर आहेत. यदाकदाचित लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र झाल्या तर … या शंकेने विधानसभेसाठीचे इच्छुकही तयारीला लागले आहेत. हा अनुभव सर्वत्र येतोय. पण पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात जरा वेगळे चित्र आहे. येथे भाजपला आव्हान देण्यासाठी कोणता पक्ष समोर येतो याची उत्सुकता आहे.

भारतीय जनता पक्षासाठी कसबा मतदार संघापेक्षा पर्वती मतदारसंघ अधिक अनुकूल मानला जातो. याच मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि त्यांचे समर्थक आहेत. पुणे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेस पक्षात प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि माजी उपमहापौर, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची नांवे इच्छुकांमध्ये घेतली जातात. यापैकी छाजेड यांनी २०१४ मध्ये येथून विधानसभा निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नगरसेवक सुभाष जगताप आणि नितीन कदम इच्छुक आहेत. मोहोळ मतदारसंघातून लढण्याची जगताप यांची इच्छा आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक उपक्रमांमधून संपर्क साधण्यास कदम यांनी प्रारंभ केल्याचे बोलले जाते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाल्यास पर्वती मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहील? यावर निवडणुकीचे गणित बरेचसे अवलंबून आहे. काँग्रेसचे दोघेही इच्छुक ज्येष्ठ असल्याने काँग्रेस नेते जागावाटपात कोणते धोरण ठेवतील? या मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचे सचिन तावरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, हेही लक्षात घ्यावयास लागेल. सेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांचेही नांव चर्चेत आहे. मनसेकडून जयराज लांडगे यांनी निवडणूक लढविली होती.