फडणवीस सरकारच्या काळातील सिडकोचा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक : काँग्रेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिडकोचा घोटाळा हे हिमनगाचे टोक असल्याचे म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कॅगच्या अहवालात सिडकोच्या कामांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस हे अडचणीत आले आहेत. या घोटाळ्यावरून काँग्रसने हे आरोप केले आहेत.

पारदर्शक कारभाराचा बुरखा फाटला
फडणवीस सरकारच्या या घोटाळ्याबाबत आरोप करताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, सिडकोच्या कामात प्रचंड अनागोंदी व अनियमितता झाली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे कॅगच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने टेंडरच्या माध्यमातून जनतेचा पैसा लुबाडला आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा गवगवा करणार्‍या फडणवीस सरकारचा बुरखा या अहवालामुळे फाटला आहे.

दोषींना शिक्षा होण्याची गरज
फडणवीस सरकारमधील 20 मंत्र्यांविरोधात काँग्रेसने भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते, परंतु एकाचीही चौकशी झाली नाही. उलट फडणवीस यांनी त्या सर्वांना क्लीनचिट दिली. ही राज्यातील जनतेची घोर फसवणूक आहे. यातून जनतेचा पैसा लुबाडण्यात आला हे आता स्पष्ट होते. यातील दोषींना आता शिक्षा होण्याची गरज आहे, अशी मागणी सावंत यांनी केली.

घोटाळ्याचा मास्टर माइंड कोण?
सावंत म्हणाले, सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतर 2000 कोटी रुपयांच्या कामांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून हा घोटाळा केला आहे. सिडकोचे काम थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली होत होते. मग एवढा मोठा घोटाळा झालाच कसा आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे, तेही आता उघड झाले पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली.

हा घोटाळा हिमनगाचे एक टोक
कॅगच्या अहवालातील मुद्यांचा आधार घेत सावंत म्हणाले की, अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला 890 कोटींची कामे दिली गेली. सिडकोचा कंत्राटदारच सिडकोचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो, हे आम्ही सरकारला विचारले असता सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कामाच्या निविदा राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती न देतात काढल्या. तर 430 कोटी रुपयांच्या 10 कामांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. हे गंभीर असून सिडकोमधील हा घोटाळा हिमनगाचे एक टोक आहे.