धनंजय मुंडेंचा पुढील राजकीय वारसदार कोण ? पहिल्या पत्नीची मुलगी की करुणा शर्मांचा मुलगा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिलेने आरोप केल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांकडून हल्लाबोल होत असताना मुंडे यांच्या नातेवाईकांकडून देखील त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे नाव रेणू शर्मा आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत धनंजय मुंडे हे 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होते. या करुणा शर्माची ही रेणू शर्मा बहिण आहे. अशी माहिती खुद्द धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करुन दिली आहे. रेणू शर्माने आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा या महिलेसोबत असलेल्या संबंधाची माहिती उजेडात आली. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. अखेर या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेत हे प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली.

करुणा शर्मा हिच्या सोबत मी 2003 मध्ये परस्पर सहमतीने संबंधात होतो अशी पोस्ट मुंडे यांनी केल्यानंतर मुंडेंचे हे प्रकरण समोर आले. तसे पाहिले तर वारसदारांमध्ये संघर्ष हा काही महाराष्ट्रासाठी किंवा राजकारणासाठी नवा नाही. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि पतुणे धनंजय मुंडे यांच्या जो संघर्ष झाला तो संपूर्ण राज्याने पाहिला. बहिण भाऊ राजकारणात एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या.

पंकजा मुंडे या 2014 च्या निवडणुकीत विजयी झाल्या. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना करुन राज्यात सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री पदाची जबाबदारी सोपवली.

2019 च्या निवडणुकीत जास्त जागा मिळून देखील भाजपला विरोधात बसावे लागले. त्यामुळे भाजपने तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. तसेच हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचे काही नेत्यांनी बोलून दाखवले. विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल सुरु असतानाच धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आणि त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एवढेच नाही तर रेणू शर्माच्या आरोपानंतर निवडणूक प्रतिज्ञा पत्रात संबंधित महिला व अपत्य यांची लपवलेली माहिती यामुळे त्यांची आमदारकीच रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.

धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी राजश्री मुंडे यांच्यापासून तीन अपत्ये आहेत. तर करुणा शर्मा यांच्यापासून दोन अपत्ये आहेत. पहिल्या पत्नीपासून वैष्णवी, जानव्ही आणि आदिश्री अशी तीन अपत्ये असून ते मुंडेंसबोत परळीमध्ये राहतात. तर करुणापासून शिवाली आणि शिव हे दोन अपत्ये आहेत. मध्यंतरीच्या काळात करुणा यांनी आपल्याला परळीला घेऊन जाण्याचा हट्ट धरला होता. आपला मुलगा शिव यालाच धनंजय मुंडे यांनी राजकीय वारसदार म्हणून पुढे आणावं अशी त्यांची इच्छा असावी. गेल्या 14 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांनी फेसबुकवर मै परली वैजनाथ आनेवाली हूं अशी पोस्ट केली आणि त्यावरुनच त्यांच्यात खटके उडत असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहीनीने दिले.

यानंतर करुणा शर्मा यांनी त्यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. यावरुन धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर करुणा यांच्या बहिणीने काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले. तर रेणू शर्मा ही महिला अनेकांना पैशांसाठी हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आलं. भाजपच्या दोन नेत्यांनी याला दुजोरा देखील दिला. या सर्व घडामोडी सुरु असतानाच हे सर्व अचानक होण्यामागे वारसदारावरुनच सुरु असलेल्या कौटुंबिक संघर्षाची पार्श्वभूमी देखील टाळली जाऊ शकत नाही.