शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावर ‘शोभा डे’ यांचा आक्षेप 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमधील महापौर निवासात उभारण्याकरिता १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘आणखी स्मारकं नको, आम्हाला शाळा आणि रुग्णालयं पाहिजेत,’ असं ट्विट डे यांनी केलं आहे. लेखिका शोभा डे यांनी सर्वसामान्यांच्या पैशाच्या या उधळपट्टीवर जोरदार आक्षेप घेतला आहे.
‘आम्हाला आणखी स्मारकांची गरज नाही. आम्हाला शाळा आणि रुग्णालयं हवी आहेत. मला १०० कोटी रुपयांचं अनुदान द्या, एक नागरिक म्हणून लोकांच्या हितासाठी त्याचा कसा वापर करायचा हे मी दाखवून देते,’ असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलं आहे.
काही दिवसांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. मात्र मुंबईच्या महापौर बंगल्याचा पर्याय निवडण्यात आला. आता दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.एमएमआरडीए सुरूवातीला हा निधी खर्च करणार आहे. त्यानंतर राज्य सरकार हा निधी एमएमआरडीएला वर्ग करेल.
यापूर्वीही अनेकदा ट्विट करण्यावरून शोभा डे अनेकदा चर्चेत आलेल्या आहेत. वेगळा तेलंगणा राज्यनिर्मितीच्या पार्श्वभूमीवर शोभा डे यांनी ट्विटरवर मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे का नको, अशा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटचा सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र शब्दांत विरोध केला होता.
आता शोभा डे यांच्या या स्मारक विरोधी भूमिकेवर शिवसेना आणि राज्य सरकार नेमकी कशी प्रतिक्रिया देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.