Congress News : काँग्रेसच्या नवीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षासाठी राहुल गांधींची ‘या’ नावांना पसंती

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून काँग्रेसची (Congress) सुरु असलेली वाताहात पाहता काँग्रेसमध्ये (Congress) संघटनात्मक बदल करण्यात येत आहे. त्यानुसार पक्ष नेतृत्व विभिन्न राज्यांत नेमणुका करीत आहे. दुसरीकडे, ग्रुप-२३ मध्ये सहभागी नेत्यांनी संघटनात्मक निवडणुकीची मागणी धरलेली आहे त्यामुळे पक्षातील मतभेद समोर येत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्यास बसविण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे. राजीव सातव, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. यावर निर्णय मात्र अजून झालेला नाही.

तामिळनाडूत काँग्रेसला फारसा जनाधार नाही. परंतु तरीही तामिळनाडू शाखेचे शनिवारी पुनर्गठन करण्यात आले. दक्षिणेतील केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांच्या नेमणुकांवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. स्वत: राहुल गांधी खासदार असलेल्या केरळात मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या जागी दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची मागणी पक्षातून होत आहे. तथापि, रामचंद्रन यांना हटविले जाणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. राज्याचे प्रभारी तारिक अन्वर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

तेलंगणात उत्तम रेड्डी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रेवंत रेड्डी यांना आणण्यासाठी के.सी. वेणुगोपाल यांनी शक्ती पणाला लावली आहे. दुसऱ्या गटास मात्र रेवंत रेड्डी नको आहेत. ते चंद्राबाबूंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जात आहे. रेवंत रेड्डी यांची नेमणूक केल्यास पक्षात फूट अटळ असल्याचे एका नेत्याने सांगितले.