फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल, म्हणाले – ‘गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत देशमुखांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब? कारण विधानसभेत गृहविभागाशी निगडीत प्रश्न विचारल्यावर अनिल देशमुख यांच्याऐवजी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हेच उत्तर देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा? हे स्पष्ट झाले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना पत्र लिहून गृहमंत्र्याची माहिती दिल्याचे सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत? परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते हे देखील स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. जोपर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपाची आंदोलन थांबणार नसल्याचाही इशारा फडणवीस यांनी दिला आहे.