‘कोरोना’वर लस म्हणजे जादूची गोळी नव्हे, WHO नं दिला मोठा इशारा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोनाचे ६ कोटी ७३ लाख ९२ हजार ७१२ रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत १५ लाख ४१ घर ७४५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही देशांत कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पुन्हा टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर लशीचे संशोधन सुरू आहे. मात्र, त्यातच आता कोरोनावरील लस ही जादूची गोळी नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.

WHO मायकल रेयान यांनी सांगितलं, की “कोरोनावरील लस आली तरी कोरोना पूर्णरीत्या नष्ट होणार नाही. कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीस सर्वांनाच उपलब्ध होणार नाही. लस विकसित झाल्यानंतर ती आपल्या मेडिकल किटमधील एक प्रमुख शक्तिशाली उपकरण असणार आहे. परंतु, लस संपूर्णपणे कोरोनास नष्ट करेल, असे होणार नसल्याचे त्यांनी नमूद केलं.”

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोनाबाबत सकारात्मक माहिती दिली होती. ते म्हणाले, “अनेक देशांत लशींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी कोरोना लस अंतिम टप्प्यात आहे. त्यांचे परिणाम पाहिले तर आता जगाने कोरोना महामारी संपेल असे स्वप्न पाहण्यास हरकत नाही,” असे मोठे वक्तव्य केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

पुढे त्यांनी म्हटलं की, “कोरोना काळात जगाने माणसाची चांगली रूपे दाखवली तशी वाईटही रूपे पाहिली आहेत. मात्र, ही महामारी संपली तरीही गरिबी, भूक आणि असमानता असे मुद्दे असणार आहेत. कोरोना संसर्गाने जगभरातील अनेकांचे मृत्यू झाले. तसेच प्रसारही मंदावला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. लस आल्यानंतरही सावधानता बाळगण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास चाचणी करणे, स्वतःला विलगीकरणात ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे टेड्रोस यांनी सांगितलं.” एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले.