सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यापासून केंद्र सरकारला कोणी रोखले ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल गांधी यांनी ‘माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर’ नाही असे म्हंटल्यापासून सावरकरांच्या नावाने राजकारण चांगलेच तापलेले आहे. त्यानंतर शिवसेनेने आमची सावरकरांच्या बाबतीत भूमिका बदललेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाण साधण्यात आला आहे.

गेल्या साडेपाच वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे मग त्यांना वीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कोणी रोखले आहे ? असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणणारी मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपसोबत आहेत. त्याचे तुम्ही काय करणार आहात ? महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा तुमचा सगळा प्रकार आहे अशा शब्दात सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात

– महाराष्ट्रात आधीच्या सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे.

– नागरिकता सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला आहे व प्रकरण केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. ईशान्येकडील राज्यांत आग लागली आहेच, पण बिहार, लखनौसह इतर राज्यांतही पेटवापेटवी सुरू झाली आहे.

– जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते. 1984च्या शीख हत्याकांडावर बोलण्याचा अधिकार आता भाजपास उरला आहे काय ?

– एका बाजूला सांगायचे, ‘सर्जिकल स्ट्राइक’ वगैरे करून आम्ही पाकिस्तानला संपवले, गुडघे टेकायला लावले व त्याच वेळी देशात भडका उडाला त्याचे खापर पाकिस्तानवर फोडायचे, हे पटणारे नाही.

– नागरिकता सुधारणा विधेयकावरून देशभरात जो हिंसेचा भडका उडाला आहे त्याबाबत पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे शांततेचे आवाहन केले आहे व या भडक्यामागे पाकिस्तानचे डोके आणि हात असल्याचे जाहीर केले आहे.

– पाकिस्तान हिंदुस्थानात काही गडबड करीत असेल तर त्यांना जन्माची अद्दल घडवणे हाच एकमेव मार्ग दिसतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशानं काय साध्य होणार?

– पण अशा बाळबोध आंतरराष्ट्रीय कूटनीतीतच आपण रमलो आहोत व भक्तांना त्याच शौर्यकथा वाटत आहेत. देशात नागरिकता सुधारणा विधेयकावरून रण पेटले असतानाच भाजपाने वीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दाही काढला.

– विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत अशा धमक्या देणाऱ्यांपैकी उद्धव ठाकरे नाहीत. अशा धमक्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.

– महाराष्ट्रातले हे वातावरण संपले आहे. नागरिकता सुधारणा बिलाचे काय करावे त्याचे मार्गदर्शन विरोधकांकडून घेण्याची गरज नाही.

– सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे ढोंग साफ उघडे पडले आहे.

– महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला, याचे उत्तर आधी जनतेला द्या.

– नागरिकता सुधारणा विधेयकापेक्षा आम्हाला महाराष्ट्राच्या 11 कोटी नागरिकांची चिंता आहे. विरोधकांना हे मान्य नसेल व ते रिकामे असतील तर त्यांनी इतर राज्यांत लागलेली आग विझवायला जावे. आम्ही बंब पुरवू.

– राजधानी दिल्लीत तर सगळ्यात जास्त तणावाचे वातावरण दिसत आहे. विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या.

– नागरिकता सुधारणा विधेयकाचे महाराष्ट्रात काय करणार, असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षाला पडला आहे. हातातून सत्ता गेली. हातातोंडाशी आलेला घास गेला.

– भीमा-कोरेगाव दंगलीत फडणवीस यांचे सरकार कसे हतबल झाले होते याचा अनुभव देशाने घेतला आहे. महाराष्ट्राची नवी कुंडली महाविकास आघाडीचे सरकार मांडत आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नयेत.

– आपल्याच देशातील विद्यार्थ्यांवर बंदुका रोखण्याची वेळ येते तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले असे समजावे. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे.

– लोकांचे लक्ष उडावे म्हणून विरोधी पक्ष फालतू उपद्व्याप करू पाहत असेल तर हे उद्योग त्यांच्या अंगलट येतील. विरोधी पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवावा.

– एका महाशक्तिमान देशात पाकिस्तानसारखा कमजोर देश अशाप्रकारे दंगेधोपे घडविण्याचे सामर्थ्य राखत असेल तर हिंदुस्थानला ते शोभणारे नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/