‘कोरोना’वर जे औषध समजले जात होते रामबाण, त्याच्याच वापरावर WHO ने आणली स्थगिती

पोलीसनामा ऑनलाईन  – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरील उपचारांमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध रामबाण मानले जात होते. मात्र आता हे औषध कोरोनाच्या रुग्णांवर फारसे प्रभावी नसल्याचे समोर आले आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) Gilead Sciences च्या या औषधाबाबत आक्षेप घेत हे औषध न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

डब्ल्यूएचओच्या (WHO) तज्ञ समितीने The BMJ या वैद्यकीय नियतकालिकाला सांगितले आहे की, रेमडेसिविर है औषध रुग्णांवर कोणत्या प्रकारची सुधारणा करते याचे काहीही पुरावे सापडलेले नाहीत. तज्ञ समितीने डब्ल्यूएचओच्या ग्लोबल ट्रायलचे रिझल्ट समोर आल्यानंतर या शिफारशी जारी केल्या आहेत.या ट्रायलला सॉलिडॅरिटी ट्रायल असे म्हटले जाते. सॉलिडॅरिटी ट्रायलच्या निष्कर्षांमध्ये रेमडेसिविर औषध मृत्यूचे आकडे कमी करण्यामध्येही अयशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. तज्ञ समितीने तीन इतर ट्रायलच्या आकड्यांचीसुद्धा समीक्षा केली आहे. समिती म्हणाली की, या औषधाचा रुग्णांवर काही खास प्रभाव दिसून आलेला नाही.

दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थद्वारे केलेल्या ट्रायलमध्ये हे औषध उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले होते. इंस्टिट्युटच्या म्हणण्यानुसार रेमडेसिवीर औषधाचा वापर रुग्णालयात दाखल रुग्णाच्या रिकव्हरीचा कालावधी पाच दिवसांपर्यंत कमी करू शकते. इन्स्टिट्युटच्या या दाव्यानंतर अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाना मंजुरी दिली होती. रेमडेसिवीर औषधावर डब्ल्यूएचओने केलेले विधान गिलियड सायन्ससाठी एक मोठा धक्का आहे.

गिलियड सायन्सने डब्ल्यूएचओच्या ट्रायलवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, एजन्सीने आतापर्यंत महत्त्वपूर्ण डेटा जारी केलेला नाही. त्यामूळे याला अंतरिम परिणामांची विश्वसनियतेचे मूल्यांकन करता येणार आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी करत म्हणाले की, रेमडेसिवीर औषध विषाणूविरोधात काम करते आणि रुग्णांचा रिकव्हरी टाइम कमी करते. तसेच जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना आणि डॉक्टर अ‍ॅटिव्हायरल उपचारांमध्ये रेमडेसिवीरच्या वापरावर सर्वप्रथम विश्वास ठेवत आहेत. अशा परिस्थिती डब्ल्यूएलचओचे दिशानिर्देश या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या जगभरातील सुमारे 50 देशांतील कोविड-19 च्या रुग्णांना है औषध दिले जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनासुद्धा कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीरचे हेच औषध देण्यात आले होते. मात्र डब्ल्यूएचओच्या तज्ञ समितीने सांगितले की, त्यांच्या निष्कर्षांचा असा अर्थ होत नाही की रेमडेसिवीर औषध हे निरुपयोगी आहे. मात्र सद्यस्थितीत उपलब्ध आकड्यांच्या आधारावर कोरोनाच्या रुग्णांच्या प्रकृतीत या औषधामुळे कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे पुरावे नाहीत.