‘कोरोना’ व्हायरसची सुरुवात कशी झाली ? तपासासाठी WHO ची टीम पुढील आठवड्यात चीनला जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात पसररलेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूची लागण होत असल्याची लाखो प्रकरणं दिवसेंदिवस समोर येत आहे. कोरोनाची उत्पत्ती गेल्या वर्षी चिनच्या वुहानमध्ये झाली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची माहिती जगाला देण्यास चीनने उशीर केला. त्यामुळे दोन महिन्यात कोरोना विषाणूची प्रकरणं जगभर पसरली. जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम पुढील आठवड्यात या विषाणूच्या उत्पत्ती आणि त्याचा प्रसार कसा झाला याची चौकशी करण्यासाठी चीनला जाणार आहे.

चीनमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाने व्हायरल न्यूमोनिया प्रकरणाबद्दल वुहान नगरपालिका आरोग्य आयोगाचा जबाब घेतल्यानंतर याचा तपास पुढील सहा महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेट्रॉस अ‍ॅड्नॉम गेबियस यांनी जानेवारीत चीनबरोबर झालेल्या आंतरराष्ट्रीय कराराबद्दल चर्चा केली. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची एक टीम लवकारत लवकर कोरोनाचा उद्रेकाची माहिती मिळवण्यासाठी पाठवून द्यावी याबाबत चीनसोबत चर्चा केली होती.

दरम्यान, कोरोना विषाणूने जगातील 5 लाखापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. आणि यामध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या विषाणूची एक कोटी पेक्षा अधिक जणांना लागण झाली आहे.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, व्हायरसच्या उत्पत्तीची सखोल चौकशी आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना चीन सरकारबरोबर यासंबंधी काम करत आहे. स्वामीनाथ यांनी सांगितले की, व्हायरसच्या उत्पत्तीची चौकशी करण्यासाठी पुढील आठवड्यात एक टीम चीनला जाणार आहे.