Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं दिला धोक्याचा इशारा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोना व्हायरसनं गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलं आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून काही देशात लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. असं असंल तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनंही याबाबत इशारा दिला आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण जगात कमी झालं आहे ही बाब दिलासा देणारी आहे. परंतु यामुळं आपण बेसावध होता कामा नये.

टेड्रोस म्हणाले, आरोग्याबाबत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळं कोरोनाग्रस्त आणि त्यामुळं मृत झालेल्यांची संख्या कमी झाली आहे असं वाटतं. संसर्ग कमी झाल्यानं आम्हीही आनंदी आहोत. परंतु यामुळं सध्याच्या परिस्थितीत समाधान व्यक्त करणं हे व्हायरस इतकंच धोकादायक असेल. अजून वेळ आलेली नाही की, कोणत्याही देशानं निर्बंध शिथील करावेत. आता जर कोणाचा मृत्यू झाला तर ते खूप त्रासदायक असेल. कारण लसीकरण सुरू झालं आहे. लोकांच्या मनात यामुळं भीती निर्माण होईल असंही त्यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, जगभरात या आठवड्यात कोरोनाचे 19 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. आधीच्या आठवड्यात ही संख्या 32 लाख इतकी होती. संसर्ग कुठून सुरू झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचं पथक नुकतंच चीनला जाऊन आलं. यातील तज्ज्ञ लवकरच अहवाल सादर करतील.

कोरोनाचे जगात आतापर्यंत 11 कोटी रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 लाख 95 हजार 906 लोकांचा यामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 8 कोटी 8 लाख 36 हजार 328 एवढी आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 8 लाख 92 हजार 550 एवढी झाली आहे. आतापर्यंत 1 लाख 55 हजार 588 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या देशात 1 लाख 38 हजार 253 रुग्ण आहेत. तर 1 कोटी 5 लाख 709 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.