कोण होता जॉर्ज फ्लॉयड ज्याच्या मृत्यूमुळं अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना तर करतच आहे, तर दुसरीकडे अमेरिकेत हिंसक निषेध होत आहे. एक काळा नागरिक जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सतत निषेध होत असून हा निषेध आता हिंसक बनला आहे. इतके कि राजधानी वॉशिंग्टनसह अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

खरं तर २५ मे रोजी अमेरिकन पोलिसांनी काळा नागरिक जॉर्ज फ्लॉइडला टॅक्सीबाहेर उतरवून जमिनीवर लोटले आणि गुडघ्याने त्याचा गळा दाबला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हापासून संपूर्ण अमेरिकेत निषेध केला जात आहे. जाणून घेऊया कोण होता जॉर्ज फ्लॉइड…

एका वृत्तसंस्थेनुसार, ४६ वर्षीय काळा नागरिक जॉर्ज फ्लॉयड आफ्रिकन अमेरिकन समुदायाचा होता. त्याचा जन्म उत्तर कॅरोलिना येथे झाला होता आणि तो ह्युस्टन येथे राहत होता, पण कामाच्या संदर्भात तो मिनीयापोलिस येथे आला. जॉर्ज मिनियापोलिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता आणि त्याच रेस्टॉरंट मालकाच्या घरी भाडे देऊन पाच वर्षांपासून राहत होता.

जॉर्जला सहा वर्षाची मुलगी आहे जी तिच्या आईसोबत ह्युस्टनमध्ये राहते. जॉर्जला ‘बिग फ्लॉयड’ म्हणून ओळखले जात होते. त्याला मिनियापोलिस शहर खूप आवडत होते, तो ह्यूस्टन सोडून नवीन संधीसाठी मिनियापोलिस येथे आला होता.

जॉर्ज फ्लॉइडला २५ मे रोजी मिनियापोलिसमध्ये स्टोअरच्या बाहेर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याचा मृत्यू झाला. अटक केलेल्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये त्याला एक पांढरा पोलिस अधिकारी डेरेक शोविनने अटक केले होते. जॉर्जचा गळा गुडघ्याने दाबणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर थर्ड डिग्री मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जवर २० डॉलर (१५०० रुपये) च्या बनावट नोटांद्वारे दुकानातून खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. पोलिसांचे म्हणणे होते की, जॉर्जने अटकेचा शारीरिक स्वरूपात विरोध केला, त्यानंतर शक्तीचा वापर करण्यात आला.

जॉर्जसाठी न्यायाची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या जवळपास डझनभर शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. मिनेसोटा राज्यात आंदोलकांनी पोलिस स्टेशन पेटवून दिले. राज्यात आणीबाणी जाहीर करावी लागली. पोलिसांना अटक करुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या दोन डझनहून अधिक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, शेकडो लोकांनी वॉशिंग्टनमधील व्हाइट हाऊसच्या बाहेर निदर्शने करण्यास सुरवात केली तेव्हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका बंकरमध्ये जावे लागले. पण अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की, त्यांच्या सुरक्षेला धोका नव्हता. तसेच सांगितले जात आहे की, ट्रम्प यांना पळत जाऊन बंकरमध्ये जावे लागले.

जॉर्जच्या मृत्यूने पुन्हा एकदा अमेरिकेत काळ्या आणि गोऱ्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेत दीर्घ काळापासून काळे लोक अत्याचाराचे शिकार होत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चार पोलिसांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे आणि तपास करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या घटनेनंतर प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली. घटनेसंदर्भात मिनियापोलिसचे महापौर जॅकब फ्रे म्हणाले की, जॉर्ज पांढरा असता तर आज जिवंत असता. तर माजी राष्ट्रपती बराक ओबामा म्हणाले की, २०२० च्या अमेरिकेत अशी घटना सामान्य होऊ नये.