ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची लागणार वर्णी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील तीन बड्या पोलीस अधिकाऱ्यांना बढती देऊन त्यांची बदली करण्यात आली. यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली करण्यात आली. त्यांच्यासह इतर दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे वर्णी लावण्यात आली. पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. सध्या ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्यावर पुढील आदेश येईपर्यंत सोपवण्यात आला आहे.

विवेक फणसळकर यांच्यासह अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांची महासंचालक न्यायिक व तांत्रिक विभागात पदोन्नती झाली आहे. तर अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती अभियान डॉ. के वेंकटेशम यांची संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आता ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात सुरु झाली आहे. मायकल रोडवर पार्क करण्यात आलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरण असेल किंवा मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण असेल या प्रकरणाचे धागेदोरे ठाणे शहराशी म्हणजे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाशी जोडले गेले होते. विवेक फणसळकर यांनी आयुक्त पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांची पदोन्नतीने बदली होणार हे निश्चित होते.

विवेक फणसळकर यांच्या बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या आयुक्त पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. ठाणे शहर आयुक्त पदासाठी रस्सिखेच सुरु झाली आहे. ठाणे आयुक्त पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी अनेकांनी मोर्चेबंधणी करण्यास सुरु केली आहे. ठाणे शहर आयुक्त पदावार सेवा ज्येष्ठतेनुसार आयपीएस अधिकाऱ्याची वर्णी लागणार, की सरकारच्या मर्जीतील व्यक्ती या पदावर नियुक्त होते हे लवकरच समजेल.

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे विविक फणसळकर यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. सध्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये संजय पांडे हे सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आहेत. मात्र, सरकारने त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक पदावर नाट्यमयरित्या केली. तर पोलीस महासंचालक पदावर असलेले हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची लॉटरी लागली.

ठाणे आयुक्त पद हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असून आता अतरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची ठाणे पोलिस आयुक्त पदावर वर्णी लागणार आहे. यासाठी अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र, राज्य सरकार ठाणे आयुक्त पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अधीच अनेक आरोपांनी घेरले गेलेल्या राज्य सरकारला आता कोणत्याही वादात पडायचे नाही. त्यामुळे ठाणे शहर आयुक्त पदाची नियुक्ती ही पारदर्शक होईल अशी चर्चा आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी असलेले प्रशांत बुरडे, देवेन भारती, बी.के. सिंग, आशुतोष डुंबरे यांच्यासह अनेक अधिकारी ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. मात्र, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जगजीत सिंग यांच्या गळ्यात ठाणे आयुक्त पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार आयपीएस अधिकाऱ्यांची नावे :

1989 बॅचचे अधिकारी – बी.के उपाध्याय, प्रज्ञा सदावर्ते, संजय कुमार, राजेंद्र सिंह, जगजीत सिंग, सदानंद दाते, अरुणचंद्र कुलकर्णी, बिपीनकुमार सिंग, संजयकुमार वर्मा, एस. जगन्नाथ, मारिया फर्नांडीस.

1992 बॅचचे अधिकारी –  रतेशकुमार, अमिताभ गुप्ता, संजीव सिंघल

1993 बॅचचे अधिकारी –  अर्चना त्यागी, संजय सक्सेना, प्रभात कुमार, प्रशांत बुरडे, आशुतोष डुंबरे, देवेन भारती, अनुपकुमार सिंग