पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष कोण? ‘ही’ 4 नावं चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, या पदावर पर्यायी चेहरा मिळेपर्यंत चेतन तुपे यांच्याकडेच शहराध्यक्षपदाचा कार्यभार राहिल, असे सांगण्यात आले आहे. पण आता या पदावर पुण्यातील इच्छुकांची नावे समोर येत आहेत.

चेतन तुपे यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यातून ते आता बरे झाले आहेत. बरे होताच त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी पुणे दौऱ्यात यासंबंधी चर्चा केली आहे. त्यांनी शहराध्यक्षपदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी विनंतीवजा पत्रही दिले. त्यामध्ये त्यांनी हडपसर मतदारसंघाचा आमदार असल्याने विकासकामांसाठी वेळ देता यावा, म्हणून आपण मला शहराध्यक्ष पदातून मुक्त करावे, असे सांगितले होते. चेतन तुपे यांनी राजीनामा दिल्याचे समजल्यानंतर इच्छुकांनी या पदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

पुणे शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, दीपक मानकर, सचिन दोडके यांची नावे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. भाजपच्या ताब्यात असलेली पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतुर झाली आहे. त्यानुसार, शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदावर निवड करताना महापालिकेच्या राजकारणाचा दांडगा अनुभव असणाऱ्या व्यक्तीचा विचार केला जाणार असल्याचे असल्याचे निश्चित मानले जात आहे.