मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 24 व 25 ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दि. 24 च्या रात्री ते नगरमध्ये मुक्कामी आहेत. या जनादेश यात्रेत जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोण नेते अथवा आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्ह्यातील आघाडीतील अनेक नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. प्रवेश करणाऱ्या नेत्याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांच्या भाजपप्रवेशानंतर भाजपमध्ये जिल्ह्यातील अनेक नेते व आमदार प्रवेशासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दोन दिवस जिल्ह्यात आहे. या यात्रेत आघाडीला मोठा धक्का बसेल व अनेक नेते भाजपात प्रवेश करतील, असे विधान पालकमंत्री राम शिंदे यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांचा दौरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय जनता पक्षाकडून दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे. जवळ येऊन ठेपलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये भाजपात कोण प्रवेश करणार, यावरून राजकीय चर्चा सुरू आहे. भाजपात येण्यास इच्छुक असलेल्या भाजपच्या आघाडीतील नेमक्या कोणत्या नेत्या व आमदारांना पक्षात प्रवेश मिळणार की एकही आमदार पक्षात प्रवेश करणार नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे.

आरोग्यविषयक वृत्त