10 रुपयांत पूर्ण अन्न, 1 रुपयात प्राथमिक आरोग्य तपासण्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या ५ वर्षात भाजपा सरकारमध्ये शिवसेना भागीदार होती. असे असतानाही दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर १० रुपयांत पूर्ण अन्न, १ रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याना मोफत बस सेवा, ३०० युनिटचा घरगुती वीज वापराचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार अशा महत्वाच्या घोषणांचा सपाटा लावला.
निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भगवा फडकणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे उत्साहात शिवतिर्थ येथे साजरा झाला. यावेळी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला नसला तरी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी आपल्या २७ मिनिटांच्या भाषणात अनेक घोषणा केल्या. शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही तर कर्जमुक्ती द्यायची आहे. युतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे वचन ठाकरे यांनी यावेळी दिले.

अजित पवारांच्या राजीनामा नाट्याचाही समाचार घेताना ठाकरे म्हणाले, की अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रु पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रु आठवले. त्याचबरोबर पुन्हा एकदा त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा, या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Visit : Policenama.com