…म्हणून अजित पवारांनी शरद पवारांविरुद्ध ‘बंड’ केलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी नेते आमदार अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केली आणि ते भाजपला सामील झाले. आज सकाळी (शनिवार, दि. 23 नोव्हेंबर) त्यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांबद्दल नेमका काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय पक्षाची समिती घेईल. अजित पवार जर भाजपसोबत जात असेल तर त्यामागे काही तरी कारणं नक्कीच असतील. काही गोष्टींमुळे ते नाराज असावेत असं वक्तव्य सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे वारसदार कोण ?
दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक सुबोध कुमार यांच्या मते, राष्ट्रवादीचा नेमका वारसदार कोण यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद असावेत. भाजपनं हेच हेरलं आणि अजित पवारांना पक्षातून फोडलं. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रम बनवत राहिले अशात भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन सरकार बनवलं. अजित पवारांऐवजी सुप्रिया सुळेंचं पक्षात वजन वाढत चालल्याने ते नाराज झाले असावेत.

डावललं गेल्याची भावना
विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली होती. यावेळी अजित पवारांऐवजी दुसऱ्याच नेत्यांना याचं नेतृत्व देण्यात आलं होतं. पक्षात डावललं जात असल्यानं त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. परंतु त्यांनी ही नाराजी कधीच जाहीर केली नाही. राजकीय तज्ज्ञांच्या मते, अजित पवार यांनी काका शरद पवारांकडून राजकराणाचे धडे घेतले आहेत. म्हणून संधी मिळताच अजित पवारांनी डाव साधला आणि आपला गट घेऊन त्यांनी भाजपला पाठिंबा दिला.

Visit : Policenama.com