भाजप अन् राष्ट्रवादीच्या युतीचा प्लॅन का फिस्टकला ?, Trading Power पुस्तकातील धक्कादायक खुलाशाने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच लेखिका प्रियम गांधी (Writer Priyam Gandhi) यांच्या ‘Trading Power’ पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या वर्षी सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर गांधींनी हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, त्यात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील युती का फिस्कटली (why-bjp-and-ncp-did-not-form-alliance-shocking-revelation-book-trading-power? ) याबाबत महत्त्वाचे दावेही यात केले आहेत.

याबाबत लेखिका प्रियम गांधी म्हणाल्या की, गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेत्यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे त्यांनी फडणवीसांना सांगितले, त्यानंतर फडणवीसांनी तातडीने अमित शाहसोबत चर्चा केली. दुसऱ्याच दिवशी दिल्लीत शाह यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक झाली, या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत शरद पवारांनी स्वत: अमित शाहना भाजपसोबत येण्यास तयार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री कोणाचा असेल आणि मंत्रिमंडळ फॉर्म्यूला कसा असेल यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर लोकांच्या स्थितीचा आढावा पाहून राज्याला स्थिर सरकारची गरज आहे असे सांगत राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करणार होते. 28 तारखेला शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना-काँग्रेसही सरकार बनवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, शरद पवारांच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील, यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदलले असावे, असा दावा लेखिकेने या पुस्तकात केला आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत लेखिकेने हा दावा केला होता.

दरम्यान, शरद पवारांनी निर्णय बदलल्यानंतर अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी विरोध केला, तीन पक्षाचे सरकार चालू शकत नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे भाजपला पाठिंबा द्यावा, असे अजित पवारांनी सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने पुन्हा फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा अजित पवार ठरल्याप्रमाणे भाजपला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले गेले. फडणवीसांनी अजितदादांना हे खरे आहे का, असे विचारले तेव्हा पवारांनी माझ्यासोबत 28 आमदार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील घटना घडली होती. 22 नोव्हेंबरला नेहरू सेंटर येथे आघाडीची बैठक सुरू असताना अजित पवार बैठकीतून थेट वर्षावर पोहाेचलेले आणि फडणवीसांना सांगितले की, या तिघांचे एकमत जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आपल्याला आधी दावा करावा लागेल, तेव्हा फडणवीस यांनी रात्रीच अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार भाजपने पावले उचलली. अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते असल्याने त्यांच्याकडे आमदारांच्या सह्या होत्या, त्या आधारे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केली, अजित पवारांसोबत असलेले आमदार भाजपला पाठिंबा देण्यास तयार होते, परंतु सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने हा प्लॅन फिस्कटला, असेही लेखिका गांधी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.