बारामतीच्या वकिलाची थेट CM अन् राज्यपालांकडे तक्रार, म्हणाले – ‘मराठी राजभाषा असतानाही ‘ब्रेक द चैन’चे आदेश इंग्रजीत का?’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारने ब्रेक द चैनचे आदेश जारी केले आहेत. मात्र हे आदेश इंग्रजीत का काढले आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असतानाही हे आदेश इंग्रजीत काढणाऱ्या मुख्यसचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करत राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान मुख्य सचिवांच्या इंग्रजी भाषेतील आदेशाचे राज्यातील कोणत्याही एका मंत्र्याने वाचन करून मराठीत अनुवाद करावा. त्यांचा मी यथोचित शाल श्रीफळ देऊन सन्मान करेन, असे आव्हान अ‍ॅड. झेंडे यांनी दिले आहे.

ब्रेक द चैनचा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहीने इंग्रजी भाषेत काढण्यात आला आहे. या आदेशाचे पालन जनतेने करायचे आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत ते पोहचले आहेत का, गावागावात ग्रामपंचायतीपर्यंत शासनाने आदेश पोहचविले का, जनतेला इंग्रजी भाषेतील आदेश समजला का, तुम्ही नुसते जाहीर करा पालन आम्ही करतो, ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्षात आदेशच पोहोचला नाही. गावा गावात दवंडी रजिस्टरला नोंद घ्यावी लागते, ती घेतली का, असा सवाल अ‍ॅड. झेंडे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी भाषा आहे. शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार राज्य शासनाची सर्व कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेशी केलेले सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवार्य आहे. तरीदेखील मुख्यसचिवांनी टाळेबंदी आदेश इंगजी भाषेत काढला आहे. याबाबत मुख्य सचिवांना योग्य ते आदेश द्यावेत. तसेच सदरचे आदेश राजभाषा मराठीत काढण्याचे आदेश द्यावे अशी मागणी अ‍ॅड झेंडे यांनी केली आहे.